नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट विश्वात 'स्विंगचा किंग' अशी ओळख निर्माण केलेल्या इरफान पठाणने आज (शनिवार) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. गोलंदाज म्हणून संघात पदार्पण केलेल्या इरफानने फलंदाजीतही छाप सोडली. तेव्हा त्याची तुलना अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी करण्यात आली. दरम्यान, इरफानने निवृत्तीची घोषणा करतेवेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निवृत्तीच्या घोषणा करताना इरफान म्हणाला, 'हा माझ्यासाठी खूप भावूक क्षण आहे, पण ही वेळ प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येते. मी खूप लहान ठिकाणाहून आलो आहे. मला सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. हे प्रत्येकाचं स्वप्न असते. ती संधी मला मिळाली.'
'मी त्या सर्व सहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो, ज्यांनी मला नेहमी सहकार्य केले. मी तो खेळ अधिकृतपणे सोडतोय, जो मला सर्वाधिक प्रिय आहे, असे सांगत त्याने आपले संघातील सर्व सदस्य, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले.
दरम्यान, इरफानने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबर २०१२ रोजी खेळला होता. हा टी-२० सामना होता.
इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, एकदिवसीय मध्ये १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी-२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.