हैदराबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ६ गडी आणि ८ चेंडू राखून हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 94 धावा आणि लोकेश राहुलच्या 62 धावांमुळे भारताने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
भारताने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा ठोकल्या. लेंडल सिमन्सला २ धावांवर बाद झाल्यानंतर, लुईस आणि ब्रँडन किंगने संघाचा डाव सांभाळला. सिमन्सला दीपक चहरने बाद केले. लुईसने ४ षटकार आणि ३ चौकारांसह ४० धावा चोपल्या. तर किंगने १ षटकार आणि ३ चौकारांसह ३१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर, शिम्रॉन हेटमायर आणि कर्णधार पोलार्डने मोर्चा सांभाळला. शिम्रॉन हेटमायरने 56 तर पोलार्डने 37 धावा काढल्या. भारताकडून दीपक चहर दोन तर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानेदेखील सावध सुरुवात केली. रोहित शर्मा 8 धावा काढून झेलबाद झाल्याने भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. त्यानंतर लोकेश राहुलला विराट कोहलीने चांगली साथ देत सामन्यावरील पकड मजबूत केली. लोकेश राहुल 62 धावा काढून झेलबाद झाला. लोकेश बाद झाल्यानंतर विराट कोहलीने सामन्याची धुरा सांभाळली. वेस्ट इंडिजकडून खॉरी पीएरी या गोलंदाजाने सर्वाधिक दोन बळी घेतले.
हेही वाचा - #HBDJaspritBumrah : आईचा ओरडा खाल्यामुळे बुमराह ठरला 'यॉर्कर किंग'
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेची हैदराबाद येथून सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघ आगामी विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. प्रत्येक जण दमदार कामगिरी करून संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दोन्ही संघांची Playing XI -
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.
वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शिम्रॉन हेटमायर, खॉरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, केसरिक विल्यम्स.