हॅमिल्टन - टीम इंडियाला न्यूझीलंडमध्ये इतिहास घडवण्याची आज मोठी संधी असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज हॅमिल्टनच्या सेडॉल पार्कवर तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंड भूमीत पहिल्या मालिका विजयाची संधी भारताला आहे. हा सामना दुपारी १२.२० ला सुरू होईल.
हेही वाचा - ICC U-१९ World Cup २०२० : ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून टीम इंडिया उपांत्य फेरीत
ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने सहज विजय नोंदवला. हे सामने भारताने अनुक्रमे सहा आणि सात गडी राखून जिंकत २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तोच फॉर्म कायम राखण्यासाठी विराटसेना प्रयत्न करणार आहे.
याआधी भारताला दोन्ही वेळेला मालिका जिंकण्यात अपयश आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००८-०९ मध्ये ०-२ अशी हार पत्करली होती तर गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला १-२ असे पराभूत व्हावे लागले होते.
दुसरीकडे, केन विल्यम्सन आणि संघ पहिल्या-वहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. पहिल्या दोन सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत मेळ साधण्यात न्यूझीलंडचा संघ अपयशी ठरला होता. त्यामुळे आज हॅमिल्टनवर विजय मिळवून मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्याचा मानस यजमान संघाचा असेल.
संघ -
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेइफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.