गयाना - वेस्ट इंडिज विरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने, विंडिजवर ७ गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांतच ३ गड्याचा मोबदल्यात पूर्ण केले. फलंदाजीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत या दोघांनी अर्धशतके झळकावली तर गोलंदाजीत दीपक चहारने ४ धावा देत ३ गडी बाद केले.
गयानाच्या मैदानावर ओल असल्याने सामन्याला नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरुवात झाली. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. विडिंजची आघाडीची फळी लवकर बाद झाली. तेव्हा, स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड याने ४५ चेंडूत ५८ धावा करत संघाचा डाव सावरला. त्याच्या आणि रोव्हमन पॉवेल (२० चेंडूत ३२ धावा) याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ बाद १४६ धावा केल्या. भारताकडून दीपक चहारने ३, नवदीप सैनीने २ तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण करणारा राहुल चहार याने १ बळी मिळवला.
विडिंजचे १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच लोकेश राहुल १८ धावा करुन परतला. त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली (५९ धावा) आणि ऋषभ पंत या दोघांनी १०६ धावांची भागिदारी करत भारताला विजयाजवळ नेले. भारताचा विजय टप्प्यात आल्यानंतर थॉमसने कोहलीला बाद केले.
त्यानंतर ऋषभ पंतने डावाची सर्वसुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला सोपा विजय मिळवून दिला. पंतने ४ चौकार ४ षटकाराच्या मदतीने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या.