फ्लोरिडा - वेस्ट इंडिजच्या ९६ धावांच्या आव्हान भारताने ४ गडी आणि १६ चेंडू राखून पूर्ण केले. मात्र भारताला या विजयासाठी सहा फलदांज गमवावे लागले. दरम्यान, भारतीय गोलंदाजी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला ९५ धावांवर रोखण्यात भारताला यश आले.
वेस्ट इंडिजचे ९६ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या ४ असताना सलामीवीर शिखर धवन बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्मा २४ धावांवर उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला यष्टीरक्षक ऋषभ पंत भोपळाही न फोडता बाद झाला.
भारतीय संघाची अवस्था ६.४ षटकात ३ गडी बाद ३२ अशी झाली होती. तेव्हा कर्णधार विराट कोहली आणि मनीष पांडे यांनी संघाला संकटातून बाहेर काढले. मनीष पांडे व्यक्तीगत १९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर अवघ्या पाच धावात कर्णधार कोहलीही १९ धावांवर बाद झाला. यानंतर कृणाल पांड्या आणि रविंद्र जडेजाने भारताला विजयाच्या जवळ नेले. मात्र, मोक्याच्या क्षणी पांड्या १२ धावांवर बाद झाला. जडेजा आणि सुंदरच्या जोडीने कोणतीही पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, कर्णधार कोहलीने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय युवा गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्याच षटकात सुंदरने विंडीजचा सलामीवर जॉन कॅम्बेलचा बळी घेतला. त्यानंतर लगेच दुसऱ्या षटकात भुवनेश्वरने एव्हीन लुईसला माघारी धाडले. एकीकडून गडी बाद होत असताना किरॉन पोलार्डने ४९ धावांची खेळी केली. भारताकडून नवदीप सैनीने ३, भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले. त्यांना वॉशिंग्टन सुंदर, खलिल अहमद, कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी १ बळी घेत चांगली साथ दिली.