पुणे - भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद करण्याचा टप्पा ओलांडला आहे. मागील ६ वर्षांपासून आंतराराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या शमीने आज दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटीत, दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मुथुस्वामीला बाद करुन ३०० विकेट पूर्ण केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने शमी आगामी काळात स्विंगचा बादशाह ठरू शकतो, असे भाकित वर्तवले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यातील गहुंजे मैदानात ३ सामन्यांच्या मालिकेतील २ सामना पार पडला. हा सामना भारताने एक डाव आणि १३७ धावांनी जिंकला. दरम्यान, हा विजय भारताचा दक्षिण आफ्रिका विरोधातला सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी शमीने आफ्रिकेच्या मुथुस्वामीला बाद करत ३०० विकेट पूर्ण केल्या. या सामन्यातील पहिल्या डावात शमीने दोन विकेट घेतल्या होत्या.
उजव्या हाताचा गोलंदाज मोहम्मद शमीने २०१३ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सहा वर्षानंतर शमीने ३०० विकेटचा टप्पा ओलांडला. शमीने ३०० विकेटमधील १८२ खेळाडूंना झेलबाद केले. तर ८२ खेळाडूंच्या त्रिफाळा उडवला आहे. एलबीडब्लूने शमीने ३२ फलंदाज बाद झाले आहेत.
दरम्यान, शमीने कसोटी क्रिकेटमध्ये १६१ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा शमी पहिला गोलंदाज आहे. मोहम्मद शमीने ३०० विकेटमध्ये उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या १९२ खेळाडू आणि डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या १०८ खेळाडूंना बाद केले आहे.
हेही वाचा - जागतिक कसोटी अजिंक्यपद: भारताचे अव्वलस्थान भक्कम तर पाकिस्तान तळाला
हेही वाचा - टीम इंडियाने जिंकली पुणे कसोटी, आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी मात