मोहाली - भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचे १५० धावांचे आव्हान भारताने १९ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताचा हा आफ्रिकेविरुध्द मायदेशात पहिला विजय आहे.
हेही वाचा - IND VS SA : भारतीय संघ मायदेशात पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत
आफ्रिकेच्या १५० धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहित १२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र, कर्णधार कोहली आणि शिखर धवन या दोघांची जोडी चांगली जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागिदारी रचली. हीच जोडी भारताला विजय मिळवून देणार असे वाटत असताना, धवन ४० धावांवर बाद झाला.
त्यानंतर संधी मिळालेला ऋषभ पंतही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. तेव्हा कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी कोणतीही पडझड होऊ न देता भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर श्रेय्यसने १६ धावा काढत त्याला साथ दिली. विराटच्या दमदार नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा - IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा फलंदाजीसाठी उतरलेल्या आफ्रिकेने कर्णधार क्विंटन डी कॉक (५२), टेंबा बावुमा (४९) आणि डेविड मिलरच्या १८ धावांच्या मदतीने निर्धारीत २० षटकात ५ गडी बाद १४९ धावा केल्या होत्या. भारताकडून दीपक चहरने २, नवदीप, जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.