हॅमिल्टन - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना रंगतदार ठरला. मुख्य सामना 'टॉय' ठरल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. तेव्हा न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा करत भारतासमोर विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य ठेवले. तेव्हा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला एकवेळ शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी १० धावांची गरज होती. तेव्हा रोहित शर्माने सलग दोन चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून रोमांचक विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या विजयाचा 'हिरो' रोहित शर्मा सामनावीर ठरला.
मुख्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खेळींच्या जोरावर २० षटकात ५ बाद १७९ धावा केल्या. विजयासाठी १८० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला मार्टिन गुप्टील आणि कॉलीन मुन्रो यांनी सावध सुरुवात केली, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना माघारी पाठवून सामन्यात चुरस निर्माण केली. तेव्हा कर्णधार केन विल्यम्सनने ९५ धावांची चिवट खेळ करताना सामना किवींच्या बाजूने झुकवला. मात्र, मोक्याच्या क्षणी मोहमद शमीने विल्यम्सन आणि टेलर या अनुभवी खेळाडूंना बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ९ धावांची गरज होती. तेव्हा शमीच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (६५) आणि कर्णधार विराट कोहली (३८) यांच्या खेळींच्या बळावर भारताला निर्धारित २० षटकांत ५ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्मा आणि के एल राहुलने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. या जोडीने ८९ धावांची सलामी दिली. सलामीची जोडी फुटल्यानंतर भारताच्या ठराविक अंतराने गडी बाद होत गेले.
कर्णधार विराटने शिवम दुबेला तिसऱ्या स्थानावर पाठवले. मात्र, तो धावा जमवण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा आणि शिवम दुबे लागोपाठ बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रेयस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विराट कोहली आणि मनीष पांडेने अखेरच्या काही षटकांमध्ये धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीही बाद झाल्याने, भारताला १७९ धावापर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, भारताने 'सुपर' विजयासह ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिकेत पराभूत केले आहे.