अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात आज पाचवा आणि अखेरचा निर्णायक टी-२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा टी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज टी नटराजनने फिटनेस टेस्ट पास केली असून तो पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. नटराजनने गुरुवारी इंस्टाग्राम स्टोरीवर वॉशिंग्टन सुंदरसोबत फोटो पोस्ट करून ही बातमी दिली.
![India vs England: T Natarajan joins team in Ahmedabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11086666_nat.jpg)
भारतीय संघाच्या ताफ्यात दाखल झाल्याचा आनंद आहे, असे नटराजनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नटराजनला खांदा व गुडघ्याच्या दुखण्याने ग्रासले. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी दाखल झाला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर नटराजनची यो यो टेस्ट झाली. यात तो पास झाला आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की,'नटराजनने यो-यो टेस्ट व दोन किलोमीटर धावण्याची परीक्षा पास केली आहे. यानंतर तो अहमदाबाद येथे दाखल होत बायो बबलमध्ये क्वारंटाईन होता. आज त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आणि तो आता संघासोबत जोडला गेला आहे. तो टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे.'
दरम्यान, नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांत ६ गडी बाद केले होते. तसेच त्याने एका एकदिवसीय सामन्यात दोन आणि एका कसोटीत तीन गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक लढत -
भारताला पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. भारताने याची परतफेड दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत केली. तिसरा सामना इंग्लंडने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. तेव्हा चौथ्या सामन्यात दडपणाच्या स्थितीत भारताने इंग्लंडवर सरशी साधत मालिका २-२ बरोबरीत आणली. आज उभय संघात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाचवा आणि अखेरचा निर्णायक टी-२० सामना खेळला जाणार आहे.
हेही वाचा - इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
हेही वाचा - Ind vs Eng ४th t-२० : भारताची मालिकेत बरोबरी; इंग्लंडवर मिळवला निसटता विजय