अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पावणे दोन दिवसांत संपला. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. तेव्हा भारतीय संघ देखील आपल्या पहिल्या डावात १४५ धावाच करू शकला. यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ८१ धावांत गडगडला. तेव्हा भारताने विजयासाठी मिळालेले ४९ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. भारताने हा सामना १० गडी राखून जिंकला.
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी १३ आणि तर दुसऱ्या दिवशी १७ फलंदाज बाद झाले. यामुळे या स्टेडियमच्या खेळपट्टीवर अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोटेराच्या खेळपट्टीवरून इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भिन्न मते व्यक्त केली आहेत. यात काहींनी खेळपट्टीला दोषी ठरवले आहे. तर काहींनी इंग्लंडच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले आहेत. वाचा कोण काय म्हणाले...
- मायकल वॉन काय म्हणाला...
कसोटी सामना दोन दिवसांत संपणे, ही गोष्टच मनाला पटत नाही, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याने व्यक्त केली आहे. अशा खेळपट्टीवर सामने आयोजित करायचे असल्यास एका संघाला तीनदा फलंदाजी करण्याची संधी द्यावी, असा खोचक टोला त्याने हाणला आहे.
- अॅलिस्टर कूक काय म्हणाला...
मोटेराची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नव्हती. त्यामुळेच दोन दिवसांत सामन्याचा निकाल लागला, असे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकने व्यक्त केले आहे. तसेच त्याने विराट कोहलीने केलेल्या खेळपट्टीची पाठराखण यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
- नासिर हुसेन काय म्हणाला...
अहमदाबाद डे-नाईट कसोटीत इंग्लंड संघाने अतिशय सुमार फलंदाजी केली. चेपॉकवर दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवातून त्यांनी बोध घेतला नाही. मोटेराची खेळपट्टी दुसऱ्याच दिवशी ८१ धावांत गारद होण्यासारखी नव्हती. त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा इंग्लंड संघाने फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने म्हटलं आहे.
- प्रशिक्षक सिल्वरवूड काय म्हणाले....
मोटेराची खेळपट्टी फिरकीपटूंना लाभदायक असेल, हे ठाऊक होते. परंतु दोन दिवसांतच सामना संपल्याने आमचा अपेक्षाभंग झाला, असे मत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी व्यक्त केले आहे.
- इयान बेल काय म्हणाला...
इंग्लंड क्रिकेट बोर्ड भविष्याचा फार विचार करत आहे. अॅशेस इतकीच भारताविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वपूर्ण आहे. असे असताना देखील इंग्लंड महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि संघव्यवस्थापनाने लवकरच खेळाडू व्यवस्थापन धोरण पूर्णपणे बरखास्त करावे अथवा त्यामध्ये काही बदल करावेत, असा सल्ला इंग्लंडचा माजी फलंदाज इयॉन बेलने दिला आहे.