सिडनी - अखेर सुरुवातीच्या दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आज (मंगळवारी) भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतावर १२ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने भारताला २० षटकांत १८६ धावांचे आव्हान दिले होते. या बदल्यात भारतीय संघ फक्त सात गमावून १७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून कर्णधार कोहलीने ६१ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ८५ धावांची दमदार खेळी केली. मात्र, ऐन मोक्याच्या क्षणी तो बाद झाला.
भारताकडून फलंदाची करताना शिखर धवनने २१ चेंडूत ३ चौकारांसह २८, हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २ षटकार आणि १ चौकारासह २०, शार्दुल ठाकूरने २ षटकारांसह नाबाद १७ धावा केल्या. तर संजू सॅमसनने १० धावा केल्या. मात्र, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे शून्यावरच बाद झाले.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल, सीन अॅबोट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर डॅनिअल सॅम्स आणि अन्ड्रयू टाय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटच्या षटकांत २७ धावांची गरज होती. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सुंदरने चौकार लगावला. मात्र, दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. मात्र, त्यानंतर शार्दुलने षटकार लगावला. यानंतर तीन चेंडूमंध्ये १७ धावांची गरज होती. पुढच्या चेंडूवर शार्दुलने आणखी दोन धावा घेतल्या. अशा प्रकारे भारताला २० षटकांत ७ गडी गमावून फक्त १७४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला १८७ धावांचे आव्हान दिले होते.