मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० असा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० गडी राखून धूळ चारली. तब्बल १५ वर्षांनी भारताला असा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी भारतीय संघाला २००५ मध्ये, १० गडी राखून पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, मायदेशात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या संघांना धूळ चारणाऱ्या साऱ्या भारतीय खेळाडूंचे तारे ऑस्ट्रेलियाने झटक्यात जमिनीवर आणले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ५ वेळा १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. सर्वात पहिल्यांदा असा पराभव न्यूझीलंड संघाने केला आहे. १९८१ मध्ये न्यूझीलंड संघाने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती.
भारताचा असा पराभव न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी केला आहे. यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा असा पराभव दोन वेळा केला. त्यांनी २००० आणि २००५ या साली हा कारनामा केला आहे.
भारताचा असा शेवटचा पराभव याआधी २००५ मध्ये झाला होता. दक्षिण आफ्रिकेने २००५ मध्ये भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात भारताने सर्वबाद १८८ धावा केल्या होत्या. हा सामना आफ्रिकेने ग्रीम स्मिथच्या १३४ धावांच्या खेळीने बिनबाद आणि ८५ चेंडू राखून जिंकला.
१५ वर्षानंतर असा पराभव ऑस्ट्रेलियाने केला. त्यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाची दाणादाण उडवली. भारतीय संघाने दिलेले २५५ धावांचे आव्हान, ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जोडी डेव्हिड वॉर्नर (१२८*) आणि अॅरोन फिंच (११०*) यांनीच पूर्ण केले.
दरम्यान, वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. यामुळे सारे भारतीय खेळाडूंचे तारे जमिनीवर आले आहेत.
हेही वाचा - IND VS AUS : टीम इंडियावर 'संक्रांत', वॉर्नर-फिंचमुळे कांगारुंचा दणदणीत विजय
हेही वाचा - वानखेडेवर वॉर्नरचा मोठा पराक्रम, ५००० धावा ठोकणारा ठरला वेगवान फलंदाज