ब्रिस्बेन - भारतीय संघ दुखापतीने हैरान आहे. आता ऑस्ट्रेलिया संघाला देखील एक झटका लागला आहे. सलामीवीर विल पुकोवस्कीला दुखापत झाली असून तो ब्रिस्बेन कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. उभय संघात १५ जानेवारीपासून कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया नव्या सलामी जोडीसह मैदानात उतरू शकते. याचे संकेत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिले आहेत.
सिडनीतील सामन्यातून विल पुकोवस्कीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात पुकोवस्कीने पहिल्या डावात ६२ धावांची खेळी साकारली. तर दुसऱ्या डावात तो १० धावांवर बाद झाला. पुकोवस्कीला सामन्याच्या अखेरच्या पाचव्या दिवशी दुखापत झाली. ८६ व्या षटकात त्याने क्षेत्ररक्षणादरम्यान, डाइव्ह मारून चेंडू आडवला. यात त्याचा खांदा दुखावला गेला. त्यानंतर तो काही वेळ खांद्याला पकडून मैदानात खाली बसल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, विल पुकोवस्की जर गुरूवारपर्यंत फिट झाला नाही तर त्याच्या जागेवर मार्कस हॅरिसचा समावेश संघात केला जाईल. हॅरिस डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. मार्कस हॅरिसने नऊ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याने दोन अर्धशतकासह ३८५ धावा केल्या आहे. ७९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत सिद्धार्थ कौलची दमदार हॅट्ट्रिक
हेही वाचा - BCCI ला ऑफर : सेहवाग म्हणतो, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 ची भरती होत नसेल तर मी खेळण्यास तयार...