राजकोट - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलचे कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले. राहुलने या सामन्यात ५२ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर विराटने, राहुलची ही नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती, असे सांगितले.
विजयानंतर विराटने बोलताना सांगितल की, 'आपण सोशल मीडियाच्या युगात राहतो, जिथे पॅनिक बटण लगेच दाबले जाते. मैदावर सर्वोत्कृष्ट संघ कोणता आहे, हे माहित करुन घेणे महत्वाचे असते. जेव्हा तुम्ही राहुलला या सामन्यात फलंदाजी करताना पाहिले असेल तर, त्याच्यासारख्या खेळाडूला संघातून बाहेर बसवणे कठीण आहे.'
पाचव्या क्रमांकावर संघासाठी अशी फलंदाजी करणे, राहुलची ही नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. त्याच्या या खेळीने त्याची परिपक्वता आणि स्तर दाखवून दिला असल्याचेही विराट म्हणाला.
राहुलने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८० धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला ३४० धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
भारताने विजयासाठी दिलेल्या ३४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार पुनरागमन करत भारताला चांगलेच झुंजवले. तेव्हा मोक्याच्या क्षणी कुलदीप आणि शमीने एकाच षटकात दोन बळी घेत कांगारुंना बॅकफूटवर ढकलले. यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ ३०४ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने मुंबईतील पहिला सामना १० गड्यांनी जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. तेव्हा भारताने राजकोटचा सामना ३६ धावांनी जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. १९ जानेवारीला अखेरचा निर्णायक सामना बंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील ५ खास विक्रम, वाचा एका क्लिकवर...
हेही वाचा - India vs Australia : फिंचने सांगितले, राजकोटमधील पराभवाचे कारण