दुबई - आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या महत्वाच्या दौऱ्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला पुन्हा दुखापत झाली आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. साहा दुखापतीमुळे आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या उपांत्य फेरीचा सामना खेळू शकला नव्हता.
नाणेफेक दरम्यान, हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितले की, वृद्धीमान साहाच्या पायाचे स्नायू दुखावले गेले आहेत. वॉर्नरच्या या वक्तव्यानंतर तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. साहाला दिल्लीविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यात दुखापत झाली होती. यानंतर तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला. या सामन्यात त्याची दुखापत वाढली.
निवड समितीने भारतीय कसोटी संघात साहासोबत ऋषभ पंतचा समावेश केला आहे. कसोटी मालिका सुरू होईपर्यंत जर साहाची दुखापत ठीक झाली नाही तर त्याच्याऐवजी पंतला ऑस्ट्रेलियाला पाठवले जाऊ शकते. साहाच्या दुखापतीसंदर्भात अद्याप कोणतेही अपडेट आले नाहीत.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ४ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होईल.
कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा - ...म्हणून आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र नव्हतो, डेव्हिड वॉर्नरची कबुली
हेही वाचा - Women's T20 Challenge : सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात जेतेपदासाठी झुंज