चेन्नई - इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत किंवा इंग्लंड विजेतेपद जिंकू शकेल. भारतीय गोलंदाजी मजबूत आहे, त्याच्या जोरावर कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला पुन्हा एकदा विश्वकरंडकावर नाव कोरता येईल, असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे.
विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्यास अजून एक ते दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यापूर्वी विश्वचषक कोण जिंकणार? हे भाकित केले जात आहे. अनेक माजी दिग्ग्ज भारतीय संघाला झुकते माप देत आहेत. तसेच इंग्लंडला घरच्या वातावरणाचा फायदा मिळू शकतो, असे मॅकग्राला वाटते.
मॅकग्रा पुढे बोलताना म्हणाला की, भुवनेश्वरकुमार भेदक गोलंदाजी करत आहे. इशांतकडे खूप अनुभव आहे. जसप्रीत बुमराहकडे प्रचंड गुणवत्ता असून डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यात आणि महत्त्वाच्या क्षणी बळी घेण्यात माहीर आहे. यॉर्कर्स आणि रिव्हर्स सिंग हे त्याचे मुख्य अस्त्र आहे. हेच गोलंदाज भारताला विश्वविजेता बनवू शकतील, असे भाकित मॅकग्राने केले आहे.