गुवाहाटी - भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला आज रविवारीपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी येथे रंगणार असून नवीन वर्षाची सुरूवात विजयाने करण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे. बर्सापारा स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
हेही वाचा - इरफान पठाणच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातील प्रतिक्रिया
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतीनंतर संघात निवड झालेला जसप्रीत बुमराह या सामन्याचे आकर्षणबिंदू ठरणार आहेत. धवन दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकून त्याने आपली निवड सिद्ध केली. आता हाच फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर धवन पुढे सुरू ठेवू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली असल्याने धवनवरील जबाबदारी वाढलेली आहे.
धवनव्यतिरिक्त सलामीवीर लोकेश राहुलसाठी स्वत: ला सिद्ध करण्यासाठी ही मालिका आणखी एक व्यासपीठ आहे. राहुलने विंडीजविरुद्ध दमदार कामगिरी नोंदवली असून लंकेविरुद्ध त्याची कामगिरी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची प्रबळ दावेदारी ठरेल.
जुलैमध्ये बुमराह विंडीज दौर्यावरही जखमी झाला होता. त्यानंतर त्याची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. बुमराहसाठी ही मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका कसोटीची ठरणार आहे.
दुसरीकडे श्रीलंकेसाठीसुद्धा हा प्रवास सोपा नसेल. कर्णधार लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेने अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला संघात बोलावले आहे. या दोघांव्यतिरिक्त निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, धनंजय डी'सिल्वासारखे खेळाडूही संघासाठी बहुमूल्य योगदान देऊ शकतात. आजच्या सामन्यात भारताचा संघ फेव्हरिट असला तरी, मर्यादित षटकांच्या या प्रकारात लंकेच्या संघाकडे टीम इंडियाला मात देण्याची क्षमता नक्कीच आहे.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.
टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -
लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणातिलाका, अविष्का फर्नांडो, अँजलो मँथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भनुका राजपक्षे, ओशाडा फर्नांडो, वनिंदु हसरंगा, लहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षन संदाकन आणि कसुन रजीता.