अहमदाबाद - पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा ८ गडी राखून पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने इंग्लंडला विजयासाठी १२५ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडने हे आव्हान फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर जेसन रॉयने ३२ चेंडूत ४९ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
जेसन रॉय (४९) आणि जोस बटलर (२८) या दोघांनी इंग्लंडला ७२ धावांची सलामी दिली. तेव्हा युझवेंद्र चहलने आठव्या षटकात जोस बटलरला पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ १२व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला पायचीत करून माघारी धाडले. मात्र, तोपर्यंत या दोघांनी सामना इंग्लंडच्या पारड्यात टाकला होता.
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर डेविड मलान(२४) आणि जॉनी बेयरस्टो (२६) यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या २ धावा असताना भरवशाच्या के. एल. राहुलला जोफ्रा आर्चरने माघारी धाडले. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीने देखील पॅव्हेलियनचा रस्ता धरला.
भारताची अवस्था ३ धावांवर २ विकेट अशी झाली होती. अशात शिखर धवनला (४) वूडने बाद करत भारताला अडचणीत ढकलले. तेव्हा ऋषभ पंत (२१) आणि श्रेयस अय्यर (६७) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. १०व्या षटकात बेन स्टोक्सने पंतला बेयरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर हार्दिक पांड्या (१९) आणि श्रेयस अय्यर यांनी ५४ धावांची भागीदारी करत भारताला शंभरी गाठून दिली. हार्दिक बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर(०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर (३) आणि अक्षर पटेल (७) यांनी भारताला १२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.