बेळगाव - २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघावर एक डाव आणि २०५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज राहुल चहरने शानदार गोलंदाजी करत ८ विकेट पटकावले. तर संदीप वारियर आणि जयंत यादवव यांनी प्रत्येकी चार-चार विकेट घेतलेत.
खेळल्या गेलेल्या या अनऑफिशिअल कसोटी सामन्यात भारत 'अ' संघाने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने आपल्या पहिल्या डावात ५ गडी गमावत ६२२ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका संघाने पहिल्या डावात सर्वबाद केवळ २३२ धावांच केल्या. त्यामुळे भारताने श्रीलंकला फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संघ १८५ वर गारद झाल्याने भारताने मोठा विजय साजरा केला.
भारतासाठी अभिमन्यू इश्वरनने २३३, कर्णधार प्रियांक पांचाळने १६० आणि अनमोलप्रित सिंहने केलेल्या नाबाद ११६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने रविवारी ५ विकेट गमावत ६२२ धावांवर आपला डाव घोषित केला होता.