वेलिंग्टन - भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ सलामीला उतरतील, असे संकेत दिले आहे. यामुळे शुभमन गिलला अंतिम ११ मध्ये संधी मिळणे कठिण आहे. पहिल्यांदा दुखापतीमुळे शिखर धवनने न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. यानंतर रोहित शर्माला टी-२० मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडला.
पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, 'भारतीय संघ नैसर्गिक खेळ खेळण्यास उत्सुक आहे. पृथ्वी शॉ एक चांगला खेळाडू आहे. त्याचा अनुभव कमी आहे पण त्याच्याकडे चांगली खेळी करण्याची क्षमता आहे. यामुळे तोच आमच्या उपयोगी येऊ शकतो. माझ्या मते मयांक ऑस्ट्रेलियामध्ये जशी कामगिरी केली होती तशीच कामगिरी तो न्यूझीलंडविरुद्ध करेल. तसेच तो गेल्या अनेक वर्षांपासून धावा करत आहे.'
विराटच्या या वक्तव्यावरून पृथ्वी शॉ विदेशात पहिली कसोटी खेळणार हे जवळपास निश्चित आहे. पृथ्वीने त्याच्या करिअरच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर बंदीला त्याला सामोरे जावे लागले होते. तो काही काळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. दरम्यान विराटच्या वक्तव्यावरुन पहिल्या कसोटीत शुभमन गिलचा पत्ता कट झाल्यात जमा आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.
हेही वाचा -
आयपीएलपेक्षा ६ पटीने कमी आहे पाकिस्तानच्या टी-२० लीगच्या बक्षीसाची रक्कम!
हेही वाचा -
VIDEO : जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आतून कसं दिसतंय पाहायचंय का?