माउंट माउंगानुई - न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा ३-० ने सफाया करत टी-२० तील पराभवाचा वचपा काढला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले २९७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४७.१ षटकात सहज पूर्ण केले. सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी झुंजार खेळी केली. तर अखेरच्या क्षणी कॉलिन डी ग्रँडहोमने आक्रमक अर्धशतक झळकावले. दरम्यान, सामना गमावल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आम्ही विजयाच्या लायक नव्हतो, अशी भावना व्यक्त केली.
विराट म्हणाला की, 'न्यूझीलंडने पहिला सामना वगळता उरलेल्या दोन्ही सामन्याच आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली. संपूर्ण मालिकेत आमचे क्षेत्ररक्षण गचाळ ठरले. आमच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचा खेळ झाला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडने प्रत्येक सामन्यागणीक आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. सर्व चुका पाहता आम्ही विजयासाठी लायक नव्हतो.'
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. न्यूझीलंडने ही मालिका ३-० ने खिशात घातली. भारताला या मालिकेतील पराभवामुळे तब्बल ३१ वर्षानंतर व्हाईटवॉश मिळाला. तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. याआधी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडीजने ५-० असा विजय मिळवला होता.
हेही वाचा -
न्यूझीलंडनं टी-२०तील पराभवाचे उट्टे काढले, वन-डे मालिकेत भारताला दिला व्हाईटवॉश
हेही वाचा -