माउंट माउंगनुई - भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत नेस्तनाबूत केले. भारताने पाचवा आणि अखेरचा सामना ७ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० ने बाजी मारली. दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडच्या टिम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी दुबेने त्या षटकात ३४ धावा चोपल्या.
माउंट माउंगनुई येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा (६०) आणि केएल राहुल (४५) यांच्या खेळींच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १७ अशी झाली. तेव्हा अनुभवी रॉस टेलर आणि टिम सेफर्ट यांनी डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. या भागिदारीदरम्यान, सेफर्ट-टेलर या जोडीने दुबेच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि त्याच्या एका षटकात ३४ धावा वसूल केल्या.
शिवम दुबेने १० वे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सेफर्टने सलग दोन षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार वसूल केला. चौथा चेंडूवर एक धाव निघाली. पाचवा चेंडू रॉस टेलरने खेळला, यावर त्याने चौकार ठोकले. पण हा पंचांनी चेंडू नोबॉल ठरवला. तेव्हा पुढच्या चेंडूवर टेलरने षटकार खेचला. टेलरने शेवटच्या चेंडूही मैदानाबाहेर भिरकावत सहा धावा वसूल केल्या. दुबेने या षटकात ३४ धावा दिल्या.
दरम्यान, दुबे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडनंतर एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. ब्रॉड या यादीत पहिल्या स्थानावर असून त्याच्या एका षटकात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने सहा षटकार खेचले होते. याआधी स्टुअर्ट बिन्नीने २०१६ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध एका षटकात ३२ धावा दिल्या होत्या. त्याचा रेकॉर्ड दुबेने मोडला आहे.
हेही वाचा - टीम इंडियाने करुन दाखवलं.. जे जगातील कोणत्याही संघाला नाही जमलं
हेही वाचा - लाजिरवाण्या विक्रमात न्यूझीलंड अव्वलस्थानी, जाणून घ्या काय आहे...