हॅमिल्टन - न्यूझीलंडने भारतीय संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ गडी राखून पराभव केला. यानंतर आयसीसीने षटकाची गती कायम न राखल्याप्रकरणी भारतीय संघाला दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी यासंदर्भात घोषणा केली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनच्या मैदानात पहिला एकदिवसीय सामना रंगला होता. भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ४ बाद ३४७ धावा केल्या होत्या. तेव्हा न्यूझीलंड संघाने अनुभवी रॉस टेलरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हा सामना ४ गडी राखून जिंकला. भारतीय संघाने या सामन्यात षटकाची गती कायम राखली नाही. यामुळे आयसीसीने भारतीय संघाच्या मानधनातील ८० टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यात निर्धारित वेळेच्यानंतर ४ षटके टाकली.
दरम्यान, भारतीय संघाला सलग तिसऱ्या सामन्यात दंड झाला आहे. याआधीच्या टी-२० मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारतीय संघाला दंडाची शिक्षा झाली होती. याआधीच्या सामन्यात भारतीय संघाच्या मानधनातील अनुक्रमे २० आणि ४० टक्के रक्कम कापून घेण्यात आलेली होती.
भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे.
हेही वाचा - Ind vs NZ : अखेर न्यूझीलंड विजयी, ३४७ धावा करुनही भारताचा दारुण पराभव
हेही वाचा - IND vs NZ : टीम इंडियाला 'ही' चूक भोवली, बुमराह, शार्दुल ठरले खलनायक