ऑकलंड - भारताचा खेळाडू जसप्रीत बुमराह जगभरात विकेट घेणारा गोलंदाज म्हणून प्रचलित आहे. मात्र, त्याला मागील ३ एकदिवसीय सामन्यात एकही गडी बाद करता आलेला नाही. विशेष बाब म्हणजे, बुमराहच्या कारकिर्दीत असं पहिल्यादांच घडलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑकलंड येथील मैदानात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटाकत ८ बाद २७३ धावा केल्या आणि भारताला २७४ धावांचे आव्हान दिले आहे.
भारत- न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने १० षटकात ६४ धावा दिल्या. याआधी ५ फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही बुमराहने १० षटके गोलंदाजी करताना ५३ धावा दिल्या होत्या, त्या सामन्यातही बुमराहची विकेटची झोळी रिकामीच होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील अखेरच्या तिसरा सामना बंगळुरू येथे खेळवण्यात आला. १९ जानेवारीला झालेल्या या सामन्यात बुमराहने १० षटकात एकही विकेट न घेता ३८ धावा दिल्या होत्या.
दरम्यान, जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर संघात पुनरागमन करताना, आत्तापर्यंत ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या ५ सामन्यात त्याला फक्त १ विकेट घेण्यात यश आले आहे. त्याने ही विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ जानेवारीला राजकोटला झालेल्या सामन्यात घेतली होती.
हेही वाचा - तिरंगी मालिका : भारताच्या विजयात स्मृती चमकली, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा
हेही वाचा - टी-२० स्पर्धेत फिक्सिंग; पाकिस्तानच्या सलामीवीराला कारावास