चेन्नई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला आऊट करणे, हे काम कठिण असल्याचे मत इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने व्यक्त केले आहे. याचे कारण देखील मोईनने सांगितले असून त्याच्या मते, विराटच्या फलंदाजी शैलीत कच्चा दुवाच नाही.
विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटर्निटी सुट्टीवर गेला होता. आता तो भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. उभय संघातील या मालिकेसाठी दोन्ही संघ चेन्नईत दाखल झाले आहेत.
पहिल्या सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. याआधीच मोईन अलीने, विराटला आऊट करणे, कठीण असल्याचे म्हटले आहे. मोईन म्हणाला, 'आम्ही विराटला कसे आऊट करू शकू. वास्तवात तो एक शानदार खेळाडू आहे. तो नेहमी चांगले करण्यासाठी प्रोत्साहित करतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीनंतर तो आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करेल. मला माहित नाही की, आम्ही त्याला कसे आऊट करू. कारण मला वाटतं की, त्याचा कोणता कच्चा दुवा नाही.'
विराट परफेक्ट खेळाडू आहे. परंतु आमच्याकडे देखील चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. विराट चांगला माणूस देखील असून माझा तो चांगला मित्र आहे. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा क्रिकेटविषयावर जास्त बोलत नाही, असे देखील मोईनने सांगितले.
दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यात चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - मुश्ताक अली टी-२० फायनल : बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार
हेही वाचा - बुमराहने केली कुंबळेच्या गोलंदाजीची नकल, चेंडू वळला झपकन; पाहा व्हिडिओ