चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात २४ फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपला १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या संघामधून अष्टपैलू खेळाडू मोईन अली याला वगळण्यात आले आहे.
इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी जॉन बेअरस्टो याची संघात निवड केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जोफ्रा आर्चरही संघात पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. आर्चरशिवाय सलामीवीर झॅक क्रॅवली याचाही समावेश संघात आहे. त्याला दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते.
दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू मोईन अली मायदेशी परतणार आहे आणि त्यामुळे उर्वरित दोन कसोटीत इंग्लंड संघात तो नसेल. मोईन अलीच्या जागी डॉम बेस याचे पुनरागमन होत आहे.
भारतीय संघाने मालिकेत साधली बरोबरी
चेपॉक मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच विराट सेनेने इंग्लंडची भंबेरी उडवत पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढला. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १६४ धावांत आटोपला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
असा आहे इंग्लंडचा संघ -
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड
हेही वाचा - WTC : टीम इंडियाची दुसऱ्या स्थानावर झेप, इंग्लंडची मोठी घसरण
हेही वाचा - IND vs ENG: पदार्पणाच्या सामन्यात अक्षर पटेलचा खास विक्रम