मुंबई - भारताने शनिवारी इंग्लंडवर विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच टी-२० सामन्यांची मालिका ३-२ अशी फरकाने जिंकली. पण या विजयानंतर भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी आपली चूक असल्याचे मान्यही केले आहे.
शनिवारच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात २ बाद २२४ धावांचा डोंगर उभारला. यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून चूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण भारतीय संघाला निर्धारीत वेळेत २० षटके पूर्ण करता आली नाही. भारताकडून धीम्या गतीने षटके टाकली गेली आणि त्याचाच फटका आता संघाला बसला आहे. कारण या प्रकरणी आयसीसीने आता भारतीय खेळाडूंना दंड ठोठावला आहे.
पाचव्या सामन्यात भारताने निर्धारीत वेळेपेक्षा दोन षटकं कमी टाकली. संथ गतीने षटके टाकल्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. भारतीय खेळाडूंच्या मानधनातून आता ४० टक्के एवढी रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. ही कारवाई आयसीसी एलिट पॅनलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी केली.
आयसीसीने या संदर्भात सांगितलं की, भारतीय संघावर आयसीसीने कलम २.२२ नुसार कारवाई केली आहे. दरम्यान, विराटने आपली चूक मान्य केली आहे. आता यापुढील सामन्यांमध्ये भारतीय संघाला या गोष्टीपासून सावध राहावे लागणार आहे.
भारताने असा जिंकला सामना -
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-२ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ८० धावा केल्या. तर रोहितने ३४ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या संघाला २० षटकात ८ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारता आली.
हेही वाचा - IPL २०२१ : गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा, धोनीचा ११४ मीटर लांब षटकार
हेही वाचा - इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल