अहमदाबाद - सलामीवीर जोस बटलरच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने हे आव्हान १८.२ षटकात २ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. बटलरला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताचे १५७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला युझवेंद्र चहलने चौथ्या षटकात जेसन रॉयला (९) बाद करत पहिला धक्का दिला. यानंतर जोस बटलर आणि डेविड मलान या जोडीने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दुसऱ्या गड्यासाठी ५८ धावांची भागिदारी केली. वॉशिग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पंतने मलानला (१८) यष्टीचित करत ही जोडी फोडली. तेव्हा बटलरने मोर्चा सांभाळत अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसऱ्या बाजूने जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद ७७ धावांची भागिदारी करत इंग्लंडला एकहाती विजय मिळवून दिला. जोस बटलरने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारासह ८३ धावांची नाबाद खेळी केली. तर जॉनी बेअरस्टो ४० धावांवर नाबाद राहिला. भारताकडून चहल आणि सुंदर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
तत्पूर्वी, इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्मा आणि के एल राहुल ही जोडी सलामीला आली. तेव्हा मार्क वूडने तिसऱ्या षटकात राहुलला शून्यावर माघारी धाडलं. वूडने फेकलेल्या चेंडू राहुलला काही कळण्याआधीच यष्ट्यांवर जाऊन आदळला. या धक्क्यातून सावरण्याआधीच वूडने रोहित शर्माला (१५) बाद करत भारतीय संघाला अडचणीत आणले. रोहितचा झेल जोफ्रा आर्चरने टिपला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनकडून मोठ्या खेळीची आशा होती. तेव्हा ख्रिस जॉर्डनने किशनला (४) जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. तेव्हा भारताची अवस्था ५.२ षटकात ३ बाद २४ अशी केविलवाणी झाली. कर्णधार कोहली आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. पण विराटच्या चूकीच्या कॉलवर दोनच्या जागेवर तीन धाव घेताना, पंत धावबाद झाला. पंतने २० चेंडूत ३ चौकारासह २५ धावा केल्या. मार्क वूडला मोठा फटका मारण्याच्या नादात श्रेयस अय्यर (९) बाद झाला. त्याचा झेल मलानने टिपला.
विराटने हार्दिकला साथीला घेत भारताला शंभरी गाठून दिली. १७व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. विराट-हार्दिक या दोघांनी फटकेबाजी करत पाचव्या गड्यासाठी ३३ चेंडूत ७० धावांची भागिदारी केली. याच भागिदारीच्या जोरावर भारताला १५६ धावांपर्यंत मजल मारता आली होती. विराटने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली. तर हार्दिक (१७) डावाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर ख्रिस जॉर्डनने २ गडी बाद टिपले.
हेही वाचा - मॉर्गनच्या नावे खास विक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील चौथा तर इंग्लंडचा एकमेव खेळाडू
हेही वाचा - केएल राहुलच्या अपयशाचा 'सिलसिला' सुरुच, मालिकेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद