सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने भारताला विजयासाठी ४०७ धावांचे मोठे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला.
भारतीय संघातील खेळाडूंनी तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षण केले. खेळाडूंनी स्मिथ, ग्रीन, लाबूशेन आणि टिम पेन या महत्वाच्या खेळाडूंना जीवनदान दिले. भारतीय खेळाडूंनी चार सोपे झेल सोडले. या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला आणि ऑस्ट्रेलियाने भारतासमोर मोठे आव्हान ठेवले.
आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर चांगलीच पकड मिळवली. सकाळच्या सत्रात काल नाबाद राहिलेल्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी अर्धशतकं झळकावली. दोघे अनुक्रमे ७३ आणि ८१ धावांवर बाद झाले. यानंतर कॅमरुन ग्रीनने कर्णधार टिम पेन समवेत भागिदारी केली. ग्रीनने कसोटी कारकीर्दीतीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ८४ धावांची खेळी साकारली. स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीनच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात ३१२ धावा चोपल्या. भारताकडून सैनी आणि अश्विन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.
दरम्यान, भारतीय संघाला सामना वाचवण्यासाठी दीड दिवस ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. मोठे आव्हानाचा सामना करताना भारतीय संघ कशी फलंदाजी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - IND vs AUS : चौथ्या कसोटीसाठी जडेजाची जागेवर 'या' खेळाडू लागू शकते वर्णी
हेही वाचा - Ind vs Aus : सिराजवर पुन्हा वर्णद्वेषी टीका; तक्रार करताच पोलिसांनी प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकललं