मुंबई - भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे. भारताला त्यांच्याच मातीत धूळ चारण्यासाठी, ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला असून त्यासाठी त्यांनी कसून सराव केला.
भारताला त्यांच्या मातीत २०१९ या सालात धूळ चारणे अनेक संघाना जमले नाही. वर्षाच्या शेवटी भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, त्यानंतर श्रीलंकेला धूळ चारली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत दोन हात करणार आहे. उभय संघात ३ सामन्याची मालिका खेळवण्यात येणार असून या मालिकेसाठी दोनही संघ सज्ज झाले आहेत.
भारतीय संघाची गणना सद्य घडीला जगातील बलाढ्य संघात केली जाते. तसेच भारतातील खेळपट्ट्या आणि वातावरण यांचा अंदाज लवकर विरोधी संघाला येत नाही. या कारणाने भारताला त्यांच्या मातीत पराभूत करणे कठिण बनले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने भारताला त्यांच्या मातीत हरवण्यासाठी खास सराव केला.
भारतामध्ये दवाचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे सामन्याचा कल बदलू शकतो. ही बाब ओळखून ऑस्ट्रेलिया संघाने चेंडू ओला करून सराव करायला सुरुवात केली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- १४ जानेवारी - मुंबई
- १७ जानेवारी - राजकोट
- १९ जानेवारी - बंगळुरू
- ऑस्ट्रेलियाचा संघ -
- अॅरोन फिंच (कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.