मुंबई - भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी थेट बीसीसीआय आणि विराट कोहली यांना लक्ष्य केले आहे. भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत, असा आरोप गावस्कर यांनी केला आहे.
सुनिल गावस्कर यांनी एका इंग्रजी संकेतस्थळासाठी कॉलम लिहला आहे. यात ते लिहतात, 'भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि नटराजन यांच्यासारख्या खेळाडूंविरोधात एकप्रकारे भेदभाव होत आहे. अश्विनची गोलंदाजी दर्जेदार असतानाही त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेला कसरत करावी लागते. कारण संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत.'
विराटला दौरा मध्येच सोडून जाण्याची परवानगी मिळते पण...
बाप होणार आहे म्हणून विराटला दौरा मध्येच सोडून जाण्याची परवानगी मिळते. मात्र, नटराजनला मिळत नाही. आयपीएल स्पर्धेदरम्यान नटराजनच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. त्याला अद्याप आपल्या मुलीचे तोंड पाहाता आले नाही. त्याला भारतात परत जाण्याची परवानगी का दिली नाही? असा सवाल गावसकरांनी आपल्या कॉलमधून उपस्थित केला.
..तर अश्विनला संघाबाहेर बसवलं असतं
अश्विनबाबत गावसकर लिहतात की, अश्विन संघाच्या बैठकीमध्ये आपले मत माडतो. त्याला वगळता इतर खेळाडू फक्त मान हलवतात. त्यामुळेच अश्विनला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने ३५० हून अधिक विकेट घेतली आहेत. दुसऱ्या देशात अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे कौतूक होते. पण भारतात असे होत नाही. अॅडलेड कसोटीत अश्विनला विकेट घेण्यात अपयश आले असते तर त्याला दुसऱ्या सामन्यात बाहेर बसवण्यात आले असते. मात्र हाच नियम दुसऱ्या खेळाडूविषयी लागू होत नाही.
हेही वाचा - Aus vs Ind: टीम इंडिया कसोटी मालिकेत उलटफेर करू शकते; ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितलं कारण
हेही वाचा - Boxing Day Test: ऑस्ट्रेलियाच्या अंतिम इलेव्हनची घोषणा; असा आहे संघ