ब्रिस्टल - इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर इमाम-उल-हकच्या १५१ धावांच्या जोरावर ३५८ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात इमामची दिडशतकी खेळी वाया गेली असली तरी, त्याने ३६ वर्षे अबाधित असलेला कपिल देव यांचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
३६ वर्षापूर्वी भारताच्या कपिल देव यांनी १९८३ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात १७५ धावांची खेळी केली होती. त्यावेळी कपिल देव यांचे वय वय २४ वर्षे होते. तर इमामने काल झालेल्या सामन्यात १५१ धावांची शानदार खेळी साकारली. यावेळी इमामचे वय हे २३ वर्षे आहे. त्यामुळे इमाम हा दीडशतकी खेळी करणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे.
यापूर्वी वनडेत दीडशतकी खेळी करणारा सर्वात युवा खेळाडूचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. मात्र आता हा ३६ वर्षे अबाधित असलेला विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचा भाचा इमाम-उल-हकच्या नावे असणार आहे.