ब्रिस्बेन - इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य गोलंदाज झाय रिचर्डसन हा खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केन रिचर्डसन याला संघात स्थान देण्यात आले आहे. संघातील मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्क चांगल्या फॉर्मात नाही. त्यामुळे झाय रिचर्डसन याच्याकडून खूप अपेक्षा होत्या.
मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मालिकेदरम्यान शारजाह येथे झायला दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीची चाचणी केल्यानंतर कळले, की तो विश्वचषकापर्यंत ठीक होणार नाही.
यासंदर्भात, संघाचे फिजियोथेरेपिस्ट डेव्हिड बेकली म्हणाले, झायचे विश्वचषक न खेळणे हे त्याच्यासाठी आणि संघासाठीही निराशाजनक आहे. त्याच्या खांद्याची तपासणी झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर झायने नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, हे माझ्यासाठी सर्वसामन्य नाही. माझ्या कठीण प्रसंगी मला साथ देणारे माझे काही चांगले मित्र आहेत. विश्वचषक सतत येत नाही.
जानेवारीमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेत झायने चांगली कामगिरी केली होती. त्याने ५ सामन्यात ७ गडी बाद केले होते. झायने एकूण १२ सामन्यात १२ गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकात पहिला सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे.