मुंबई - बीसीसीआयचा नुकताच पदभार स्वीकारलेले नूतन पदाधिकारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदमध्ये (आयसीसी) द्वंद्व होण्याची शक्यता आहे. कारण, आयसीसीने टी-२० विश्वकरंडक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा दर तीन वर्षांनी आयोजित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. २०२३ ते २०१८ पर्यंत प्रक्षेपण हक्कातून मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने आयसीसीने हा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र बीसीसीआयने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
आयसीसी आणि संलग्न राष्ट्रीय संघटना पाच वर्षांचे वेळापत्रक बनवत असते. या वेळापत्रकानुसारच द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. यात कोणता संघ कोणत्या संघाविरुध्द मालिका खेळणार, याचा संपूर्ण लेखाजोका असतो.
२०२३ नंतरच्या पुढील पाच वर्षांसाठी आयसीसीचे वेळापत्रक तयार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी विश्वकरंडक संदर्भातील नव्या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी आयसीसीचे सीईओ मनु साहनी यांना ई-मेल करून नकाराची कारणे कळवले आहेत.
बीसीसीआयच्या एक अधिकारींनी सांगितले की, 'दरवर्षी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भरवणे रोमांचक आहे. मात्र, यात आयसीसीला प्रक्षेपण हक्काच्या माध्यमातून जास्तीचा भाग जाणार आहे. २०२३-२०१८ दरम्यानच्या मालिकेचे प्रक्षेपण हक्क जर आयसीसीने प्रथम बाजारात विकले. तर बीसीसीआयच्या महसूलावर याचा परिणाम होईल. तसेच या व्यस्त कार्यक्रमांमुळे खेळाडूंचा तणाव वाढणार आहे.'
दरम्यान, सध्या दर चार वर्षांनी एकदिवसीय विश्वकरंडक, तर दर दोन वर्षांनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात आगामी टी-२० विश्वकरंडक होणार असून एकदिवसीय विश्वकरंडक २०२३ ला भारतात होणार आहे.
हेही वाचा - आयसीसीने वाढवली महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम, मिळणार इतके कोटी
हेही वाचा - यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील 'तो' गाजलेला नियम आयसीसीने बदलला