दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या टी-२० क्रमवारीत सुधारणा झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटने दमदार कामगिरी केली. या कामगिरीचा त्याला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आयसीसीने नुकतीच टी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात विराट कोहलीने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याची क्रमवारी एका स्थानाने सुधारली आहे. दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अपयशी ठरलेला के एल राहुलची घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. याआधी तो चौथ्या स्थानी विराजमान होता. या दोघा व्यतिरिक्त टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-१० मध्ये भारताचा अन्य खेळाडू नाही.
इंग्लंडच्या डेवीड मलान (८९२), ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच (८३०) आणि पाकिस्तानचा बाबर आझम (८०१) अव्वल तीन स्थानावर कायम आहेत. विराटच्या खात्यात ७६२, तर राहुलच्या खात्यात ७४३ गुण आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कोहलीची विराट कामगिरी -
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराटने सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने पाच सामन्यात १४७.१३ च्या स्ट्राईक रेटने २३१ धावा केल्या. या कामगिरीमुळेच विराटला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
गोलंदाजी क्रमवारीत राशिद खानला धक्का -
टी-२० गोलंदाजी क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला जबर धक्का बसला आहे. त्याचे अव्वलस्थान दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने हिसकावले आहे. शम्सी ७३३ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर राशिद खान (७१९) दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन अॅगर (७०२), इंग्लंडचा आदिल राशिद ( ६९४) आणि बांगलादेशचा मुजीब उर रहमान (६८७) टॉप फाईव्हमध्ये आहेत.
हेही वाचा - Ind vs Eng १st ODI : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, कृणाल-कृष्णा पदार्पणात चमकले
हेही वाचा - IND VS ENG १st ODI : टीम इंडियाला जबर धक्का, रोहित पाठोपाठ श्रेयसला दुखापत