दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बोर्डाची अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वात गुरुवारी दूरध्वनीद्वारे बैठक झाली. या बैठकीतील सर्व निर्णय 10 जूनपर्यंत टाळण्यात आले आहेत. या बैठकीत यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित होता. मात्र, कोरोनामुळे हा निर्णयही 10 जूनपर्यंत टाळण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
आयसीसीने एका निवेदनात म्हटले, “अलीकडेच बोर्डाच्या अनेक सदस्यांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. 10 जून 2020 रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती दिली जाईल." 2021 ची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे यंदाची विश्वकरंडक स्पर्धा 2022 पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते.
कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकही एका वर्षासाठी तहकूब करण्यात आले आहे. आता पुढील वर्षी जपानच्या राजधानीत हे खेळ खेळवले जातील.