लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत १८ जूनला झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने अफगाणिस्तावर दीडशे धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह यजमान इंग्लंडने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांमध्ये इंग्लंडने ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडेही ८ गुण आहेत. मात्र इंग्लंडचा नेट रन रेट सरस असल्याने कांगारू दुसऱ्या स्थानी आहेत. इंग्लंडच्या संघाने आगेकूच केल्याने भारताचे स्थान घसरले असून भारत तिसऱ्या स्थानावरुन चौथ्यास्थानावर आला आहे.
विश्वकरंडकात आतापर्यंत अपराजित राहिलेले न्यूझीलंड आणि भारतीय संघ ७ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. भारताने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघाना पराभवाची धूळ चारली आहे. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे झाल्याने दोन्ही संघाना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता.
बांगलादेशने वेस्टइंडीजला पराभवाचा धक्का देत ५ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. तर श्रीलंका सहाव्या, वेस्टइंडीज सातव्या, दक्षिण आफ्रिका आठव्या आणि पाकिस्तान नवव्या स्थानी आहे. गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे १० व्या स्थानी अफगाणिस्तानचा संघ आहे. अफगाणिस्तानला आतापर्यत खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांपैकी एकाही सामन्यात विजय त्यांना मिळवता आला नाहीय.