ऑकलंड - वेस्ट इंडीजचे माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आता खेळत असते तर, टी-20मध्ये दिग्गज असते, असे मत न्यूझीलंडचे माजी खेळाडू इयान स्मिथ यांनी दिले आहे. टी-20 फ्रेंचायझींनी रिचर्ड्स यांना पॅट कमिन्स आणि बेन स्टोक्सपेक्षा जास्त पैसे दिले असते, असेही स्मिथ म्हणाले.
स्मिथ म्हणाले, "मला वाटते की रिचडर्स कोणत्याही दशकात क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकले असते. त्यांचा स्ट्राईक रेट त्या काळात उत्कृष्ट होता. हा स्ट्राईक रेट टी-20 चा होता."
स्मिथ यांनी रिचर्ड्स यांचे आपल्या काळातील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून वर्णन केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा जगातील सर्वोत्कृष्ट संघ ठरवला जाईल तेव्हा ते नेहमीच मनात असतील."
रिचर्ड्स हे 1975 आणि 1979 ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेल्या विंडीज संघाचे कर्णधार होते. त्यांनी 121 कसोटीत 8540 तर, 187 एकदिवसीय सामन्यात 6721 धावा केल्या आहेत. तर, स्मिथ यांनी न्यूझीलंडसाठी 63 कसोटी आणि 98 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांच्या नावावर 1815 तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1055 धावा जमा आहेत.