दुबई - आयपीएलच्या नव्या हंगामासाठी यूएईत दाखल झालेल्या विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत सरावाला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर विराटने नेट्समध्ये सरावाला सुरूवात केली. मोठ्या ब्रेकनंतर पहिला फटका खेळताना 'मी घाबरलो' असल्याची कबुली विराटने यावेळी दिली. मात्र, सरावसत्र अपेक्षेपेक्षा चांगले झाल्याचेही त्याने सांगितले.
आरसीबीच्या सराव सत्रात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि संघाचे संचालक माइक हेसन उपस्थित होते. या सरावानंतर कोहली म्हणाला, ''खरे सांगायचे तर, सरावसत्र अपेक्षेपेक्षा जास्त चांगले झाले. मी घाबरलो होतो. मी पाच महिने हातात बॅट घेतली नव्हती. मी लॉकडाउनदरम्यान प्रशिक्षण घेतले. मला खूप तंदुरुस्त वाटत आहे. शरीर हलके झाल्याने ते मला क्रियेवर उत्तम प्रतिक्रिया देत आहे. चेंडू खेळण्यासाठी अधिक वेळ मिळेल असे मला वाटते आणि हा सर्वात मोठा फायदा आहे.''
१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी आरसीबीचा संघ गेल्या आठवड्यात दुबईमध्ये दाखल झाला. २००९ आणि २०१६ मध्ये उपविजेतेपदाशिवाय आरसीबीला एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. देशात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे रोख ही टी-२० लीग भारताबाहेर हलवण्यात आली आहे.