मुंबई - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली होती. त्याचबरोबर त्याने पाक बोर्डाचे कायदे सल्लागार तफुज्जुल रिझवी यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. यामुळे शोएबला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या नोटीसवर शोएबने सडेतोड उत्तर दिले असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकरण -
पीबीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणाचा आरोप करत तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. यावरुन शोएबने त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पीसीबीच्या कायदे विभाग आणि वकील तफज्जुल रिझवी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याने पीसीबीच्या कायदे विभागासह रिझवी नालायक आहेत, असे म्हटले.
रिझवी यांनी या आरोपानंतर १० कोटींचा मानहानिकारक दावा करणारी नोटीस शोएबला पाठवली. या नोटीसमध्ये त्यांनी केलेल्या आरोपावरुन जाहीर माफी मागण्यासही सांगितले. रिझवी यांच्या नोटीसला शोएबने उत्तर दिलं आहे.
शोएब म्हणाला, रिझवीसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कायदे विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. मागील १५ वर्षापासून रिझवी पीसीबीसोबत काम करत असून त्यांचे भ्रष्टाचारांशी संबंध आहेत. मी त्याच्या नोटीसला माझ्या वकिलांकरवी उत्तर पाठवलं आहे. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे.'
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनी चतूर खेळाडू, भारताच्या अष्टपैलू खेळाडूचं मत
हेही वाचा - कपिल देव आणि इम्रान खान यांच्या तुलनेत हार्दिक कुठेच नाही, अब्दुल रझाकचे मत