नॉटिंगहॅम - क्रिकेटच्या मैदानावर सध्याच्या घडीला गोलंदाजांना धडकी भरवणारा जर कोणी असेल तर, तो म्हणजे आंद्रे रसेल. रसेलची फलंदाजी म्हणजे गोलंदाजांचा खरपूस समाचारच असतो. विश्वकरंडक स्पर्धेत रसेलची फलंदाजी पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण रसेल एका गोष्टीमुळे नाखूश आहे.
मला एका शब्दाचा खूप राग येतो. माझे नाव जेव्हा स्क्रिनवर येते तेव्हा मला मध्यमगती गोलंदाज असे म्हणतात. एक लक्षात ठेवा मी वेगवान गोलंदाज आहे, असे म्हणत आंद्रे रसेलने आपल्या नाखूशीचे कारण सांगितले आहे.
''बऱ्याच लोकांना वाटते की मी एक बिग हिटर आहे. पण त्याबरोबर मी एक वेगवान गोलंदाज आहे हे सर्व विसरतात. मला गोलंदाज म्हणून कमी लेखतात. मी 90 किमीच्या वेगाने चेंडू टाकू शकतो. मला मध्यमगती गोलंदाज म्हटले की राग येतो. त्यामुळे मला वेगवान गोलंदाज म्हणून आता मला मान मिळायला हवा,'' अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात रसेलने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन घडविले. त्याने तीन षटकांमध्ये त्याने केवळ चार धावा देत दोन फलंदाजांना बाद केले होते.