गांधीनगर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पहिल्यावाहिल्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल सायंकाळी अमेरिकेहून निघालेले त्यांचे विमान हे अहमदाबादमध्ये दाखल झाले. त्यानंतर, 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी ट्रम्प यांनी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरावर उपस्थिती नोंदवली. या स्टेडियमवर गुजराती पारंपारिक नृत्यांनी ट्रम्प कुटुंबियांचे स्वागत झाले. ट्रम्प यांच्या आगमनाने मोटेरावरील क्रिकेटचा इतिहास पुन्हा एकदा जीवंत झाला.
वाचा मोटेरावर घडलेले मोठे विक्रम -
- मोटेरावरील सर्वात महत्वाच्या विक्रमात भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांना अगक्रम दिला पाहिजे. १९८३ मध्ये गावस्कर यांनी इंग्लंडच्या जॉफ्री बॉयकॉटला मागे टाकत त्यावेळी सर्वाधिक कसोटी धावांची नोंद केली होती.
- विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनीही मोटेरावर महत्वाचा टप्पा गाठला होता. न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली यांच्या कसोटी सामन्यातील बळींच्या विक्रमाला कपिल देव यांनी पछाडले होते. १९९४ मध्ये त्यांनी हॅडली यांचा कसोटीतील ४३१ बळींचा विक्रम मोडला. १९९९ मध्ये विंडीजच्या कोर्टनी वॉल्श यांनी कपिल देव यांना पछा़डले होते.
- २०११ चा विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडेवर रंगला. मात्र, या स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी मोटेरावर ऑस्ट्रेलियाला नामोहरम केले होते.
- भारतीय संघाने या मैदानावर ४ कसोटी सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाने ७ सामने जिंकले आहेत, परंतु ८ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
- मोटेरावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० सामन्यात २०१२ मध्ये भारताने पाकिस्तानला ११ धावांनी पराभूत केले. राहुल द्रविड येथे सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आहे.
मोटेरा स्टेडियममध्ये एका वेळी एक लाख १० हजार लोक बसू शकतात. ही संख्या दक्षिण अमेरिकेतील अरूबासारख्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये एका वेळी एक लाख २४ प्रेक्षक बसू शकतात.