नवी दिल्ली - भारताच्या महिला एकदिवसीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत १७व्या स्थानी पोहोचली आहे. तर, कर्णधार मिताली राज ९व्या स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतने ४० धावा केल्या होत्या. या सामन्यात आफ्रिकेने भारताला ८ गड्यांनी धूळ चारली.
दुसऱ्या सामन्यात भारताचे कमबॅक
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेला ९ गड्यांनी मात दिली. नाणेफेक गमावलेल्या आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४१ षटकात १५७ धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामीने ४२ धावांत ४ फलंदाजांना बाद केले.
प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान २८.४ षटकातच पूर्ण केले. भारताकडून सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ८० तर, पूनम राऊतने ८ चौकारांसह ६२ धावांचे योगदान दिले. आता या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली असून तिसरा सामना शुक्रवारी होणार आहे.
हेही वाचा - आयपीएल : महेंद्रसिंह धोनीची प्रशिक्षणाला सुरुवात