कोलकाता - आयपीएलमध्ये मुंबई आणि कोलकाता यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने ३४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोलकात्याच्या विजयापेक्षा मुंबईच्या हार्दिक पांड्याने केलेल्या वादळी खेळीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याने आंद्रे रसेलच्या तुफानी ४० चेंडूत ८० धावांच्या जोरावर मुंबईसोमार २३३ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या हार्दिकने ३४ चेंडूत ९१ धावांची तडाखेबाज खेळी केली. यासह त्याने आयपीएलच्या बाराव्या मोसमात सर्वात जलद (१७ चेंडूत) अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या पूर्वी हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज रिषभ पंतच्या नावावर होता. त्याने यंदाच्या मोसमात १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
२६७.६५ च्या स्ट्राइक रेटेने हार्दिकने केलेल्या ९१ धावांच्या विस्फोटक खेळीत ९ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. सामन्यात एक क्षण असो होता की, मुंबई हा सामना जिंकेल, असे वाटत होते, मात्र पांड्या माघारी परतल्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशाही मावळल्या.