मुंबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हरभजन सिंगला रविचंद्रन अश्विनपेक्षा चांगला फिरकीपटू ठरवले आहे. युवराज सिंग बरोबर झालेल्या संभाषणादरम्यान बुमराहने अनेक क्रिकेटपटूंविषयी मते मांडली. धोनी आणि युवराज यांच्यातील निवडीला बुमराहने समान पातळीचा दर्जा दिला आहे. बुमराह म्हणाला, “मी एकाची निवडू करू शकत नाही. युवराज आणि धोनी यांच्यातील एक निवडणे म्हणजे आई-वडिलांपैकी एकाला निवडण्यासारखेच आहे. तुम्ही दोघांनी अनेक वेळा भारताला सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे हा एक अतिशय कठीण प्रश्न आहे.”
रविवारी संध्याकाळी झालेल्या या संभाषणात युवराजने बुमराहला विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यात निवड करण्यास सांगितले. त्यावर बुमराह म्हणाला, “या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मला अनुभव नाही. पण प्रत्येकजण सचिन पाजींचा चाहता आहे, म्हणून मी त्यांना निवडतो.”
त्यानंतर, युवराजने बुमराहला विचारले, की रविचंद्र अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यापैकी कोण चांगला फिरकीपटू आहे? यावर बुमराह म्हणाला, “मी अश्विनबरोबर खेळलो आहे. पण मी लहानपणापासूनच हरभजनला पाहिले आहे आणि त्याच्याबरोबर खेळलोसुद्धा आहे. म्हणून मी त्याला निवडतो.”