चेन्नई - काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरला एका व्यक्तीने मोलाचा सल्ला दिला होता. चेन्नईमधील एका वेटरने दिलेल्या सल्ल्यानुसार, सचिनने आपल्या 'एल्बो गार्ड'च्या संरचनेमध्ये बदल केला होता. याबाबतची आठवण सांगत, त्या वेटरला शोधण्यासाठी आपली मदत करावी, अशा आशयाचा व्हिडिओ सचिनने ट्विटरवर काल शेअर केला होता.
सचिनचा हा शोध आता संपला आहे. कारण, सचिनला सल्ला देणारी व्यक्ती म्हणजेच, चेन्नईच्या ताज कोरोमंडल हॉटेलमधील कर्मचारी गुरुप्रसाद! ईटीव्ही भारतच्या चेन्नईमधील प्रतिनिधीने गुरुप्रसादची भेट घेत, त्याच्याशी या सर्व घटनेबाबत चर्चा केली आहे.
यावेळी बोलताना, गुरुप्रसाद यांनी इतक्या वर्षांनंतरही सचिन तेंडुलकरला मी लक्षात आहे, हे अविश्वसनीय असल्याचे म्हटले. कारण, सचिन आणि गुरुप्रसादमधील ते संभाषण तब्बल १९ वर्षांपूर्वी घडले होते.
सचिन आपल्याला शोधत असल्याची माहिती बहिणीच्या मुलामुळे समजली. हे कळल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्यानंतर, तुम्ही ज्यांना शोधत आहात, ते माझे मामा आहेत, असा रिप्लाय माझ्या भाच्याने सचिनच्या ट्विटला दिला.
एरवी आपण पाहतो, की लोकांना आपल्या आवडत्या खेळाड़ूला भेटण्याची इच्छा असते. मात्र, इथे सचिनसारखा महान खेळाडू आपल्या चाहत्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आहे, ही खरेच आश्चर्यकारक आणि आनंददायी बाब आहे. मी सचिनला भेटण्यासाठी अत्यंत आतुर आहे, असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा : डायपरमध्ये क्रिकेटर.. पीटरसनने विराटला विचारलं, संघात घेणार का? मिळालं 'हे' उत्तर