मुंबई - इंग्लडविरुद्ध मंगळवारी पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने पदार्पण केले. या सामन्यात कृष्णाने ४ गडी बाद करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. दमदार पदार्पणानानंतर त्याने, ग्ले मॅग्राथ यांच्याकडून खूप काही शिकलो असल्याचे सांगितले.
कृष्णा म्हणाला, 'ग्लेन मॅग्राथ खूप शांत राहतात आणि ते आपल्या लाईन लेंथवर खूपच लक्ष देत असतात. ते नेहमी माझ्यासोबत सातत्याबद्दल बोलायचे. मी त्यांच्याकडून पहिली गोष्ट ही शिकलो होतो की, परिस्थिती काहीही असो. परंतु आपण वर्तमानमध्ये राहायला हवे. एका गोलंदाजासाठी हीच सर्वात महत्वाची गोष्ट असते.'
प्रसिद्ध कृष्णाने पदार्पणाच्या सामन्यात ८.१ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ५४ धावा देत ४ गडी बाद केले. प्रसिद्धने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्ज आणि टॉम कुरेन यांची विकेट घेतली.
प्रसिद्ध पदार्पणाच्या सामन्यात चार गडी बाद करणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारताने पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना १९७४ साली खेळला होता. आतापर्यंत एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात भारताच्या एकही गोलंदाजाला ४ गडी बाद करता आलेले नव्हते. नोएल डेविडने भारताकडून पदार्पणाचा सामना खेळताना १९९७ साली २१ धावांत ३ गडी बाद केले होते. त्याने हा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला होता.
दरम्यान, ग्लेन मॅग्राथ आणि प्रसिद्ध कृष्णा यांची भेट २०१७ ला पेस अकॅडमीमध्ये झाली. या अकॅडमीत मॅग्राथच्या मार्गदर्शनात कृष्णाने गोलंदाजीचे धडे गिरवले. ग्लेन मॅग्राथ यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर कृष्णाचे कौतुक केले. आपल्या एकदिवसीय पदार्पणात सर्वात जास्त विकेट्स घेऊन विक्रम केल्याबद्दल कृष्णाचे अभिनंदन. वेल डन, अशी पोस्ट मॅग्राथने केली आहे.
हेही वाचा - 'सूर्या आणि इशान भारताच्या टी-२० विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यास हकदार'
हेही वाचा - IPL २०२१ : चेन्नई संघाची जय्यत तयारी, अफगाणिस्तानहून मागवला गोलंदाज