मुंबई - भारतीय क्रिकेट संघाला विश्वविजेता करण्यात महत्त्वाची भूमिका साकारणारे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची संधी मला अवघ्या सात मिनिटात मिळाली. मुलाखतीत रवी शास्त्री यांनी प्रश्न विचारले होते आणि सुनील गावस्कर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असे कर्स्टन यांनी सांगितले.
गॅरी कर्स्टन यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्जही केला नव्हता. कर्स्टन म्हणाले की, ''भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायचे आहे का? असा ईमेल मला सुनील गावस्कर यांनी पाठवला होता. मला वाटले की हा विनोद आहे. मी त्याला उत्तरही दिले नाही. त्यांनी मला मुलाखत द्यायला आवडेल का? असा आणखी एक मेल पाठवला. मी माझ्या बायकोला तो दाखवला. त्यांच्यात कोणीतरी चुकीची व्यक्ती आहे, असे ती म्हणाली. अशाच प्रकारे मी या क्षेत्रात विचित्रपणे प्रवेश केला. मला कोचिंगचा अनुभवही नव्हता.''
रवी शास्त्रींनी घेतली होती मुलाखत -
कर्स्टन म्हणाले, "मी बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट बोर्डा) अधिकाऱ्यांसमोर होतो आणि वातावरण अत्यंत गंभीर होते. बोर्ड सेक्रेटरी म्हणाले, "कर्स्टन तुम्ही भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल आपला दृष्टीकोन मांडू इच्छिता?" मी म्हणालो, "माझ्याकडे काही नाही. मला कोणीही अशी तयारी करण्यास सांगितले नाही. मी नुकताच येथे आलो आहे." त्यानंतर, समितीत असलेले रवी शास्त्री मला म्हणाले, "गॅरी आम्हाला सांगा की तुम्ही दक्षिण आफ्रिकेचा संघ म्हणून भारतीयांना पराभूत करण्यासाठी काय केले होते."
सात मिनिटे मुलाखत -
कर्स्टन म्हणाले, ''मला वाटले की वातावरण हलके करण्यासाठी मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो. दोन किंवा तीन मिनिटांत मी त्याचे उत्तर दिले. परंतु मी अशा कोणत्याही रणनीतीचा उल्लेख केला नाही. त्यानंतर, मंडळाच्या सेक्रेटरीने तीन मिनिटानंतर हा करार माझ्याकडे हलवला. माझी मुलाखत फक्त सात मिनिटे चालली.''
कर्स्टन हे भारताचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक ठरले. त्याच्या कारकिर्दीत संघाने 2009 मध्ये कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आणि दोन वर्षांनंतर विश्वकरंडकावर नाव कोरले.