पाटना - भारताचा माजी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंह धोनी भारतीय जनता पक्षात सहभागी होणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते संजय पासवान यांनी केला आहे. क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धींना 'सळो की पळो' करणारा धोनी भाजपकडून राजकारणाच्या मैदानात उतरणार का? यांची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अद्याप धोनीने याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मागील काही दिवसांपासून महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. आता भाजपचे नेते संजय पासवान यांनी धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. 'धोनी हा माझा चांगला मित्र आहे. त्याच्यासोबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. तो आपल्या निवृत्तीनंतर भाजपमध्ये सहभागी होईल'. असे पासवान म्हणाले.
यापूर्वी भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गंभीरने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवली आणि तो विजयी झाला.