लाहोर - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या स्पर्धेत मोठा फरक आहे. पैशाच्या सहभागामुळे आयपीएल ही जगातील मोठी स्पर्धा मानली जाते, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने सांगितले. याशिवाय, आयपीएलमधून मिळालेले पैसे प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी वापरण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचेही अक्रमने कौतुक केले आहे.
अक्रमने एका यूट्यूब वाहिनीवर ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''आयपीएल आणि पीएसएलमध्ये फरक आहे. गेल्या 5-6 वर्षांत खूप फरक झाला आहे. त्यांनी बरीच गुंतवणूक केली आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाचे बजेट 60-80 कोटी आहे. जे आमच्यापेक्षा दुप्पट असेल.''
अक्रम पुढे म्हणाला, ''आयपीएलमधील बहुतेक खेळाडूंचे प्रवीण अमरे यांच्यासारखे स्वत:चे प्रशिक्षक असतात. ते अशा माजी खेळाडूंना स्थान देतात. आपण त्याच्या फलंदाजांकडे पाहा, ते किती आत्मविश्वासाने खेळतात. त्यांची व्यवस्था खूप वेगळी आहे.''
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलला गेल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. यंदाचे आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.